

Javalabazar market 17975 quintal cotton
जवळाबाजार : जवळाबाजार कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत जवळाबाजार आणि शिरडशहापुर या दोन्ही केंद्रांवर कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आतापर्यंत एकूण १७,९७५ क्विंटल कापूस बाजारात आलेला आहे. दररोज कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत.
खरीप हंगामात उत्पादित कापसाची खरेदी सीसीआयमार्फत या दोन्ही केंद्रांवर सुरू आहे. जवळाबाजार येथील जिनिंगमध्ये २५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत १६६ शेतकऱ्यांकडून २,५८३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. तर शिरडशहापुर येथील जिनिंगमध्ये १८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत ९६१ शेतकऱ्यांकडून १५,३९२ क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती खरेदी केंद्रातील कर्मचारी वर्गाने दिली.
जवळाबाजार परिसर बागायतदार क्षेत्र असल्याने सोयाबीनसारखे नगदी पीक असले तरी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. यंदा पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले, तरीही शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळत असल्याने शेतकरी उत्साहाने कापूस विक्रीसाठी बाजार समितीकडे येत आहेत.
दोन्ही खरेदी केंद्रांवर सीसीआयमार्फत कापूस खरेदी सतत सुरू असून, आतापर्यंत जवळाबाजारमध्ये २,५८३ क्विंटल आणि शिरडशहापुरमध्ये १५,३९२ क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती केंद्रातील कर्मचारी एकनाथ चव्हाण आणि गजानन चव्हाण यांनी दिली.
शेतकरी बांधवांनी आपला खरीप व रब्बी हंगामातील माल शासनाच्या हमीभावात नाफेड व सीसीआय खरेदी केंद्रांवर विकावा, असे आवाहन सभापती शिवाजी अप्पा भालेराव, उपसभापती बाबाराव राखोंडे आणि सचिव शंकर डोळस यांनी केले आहे.