

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे 1008 भगवान बाहुबली यांची देशातील दुसर्या क्रमांकाची व महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी मूर्ती उभारली आहे. या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त 2 फेब्रुवारी 2026 रोजी निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्ली येथे भेट घेऊन दिले. शिष्टमंडळास केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी कार्यक्रमास येण्याचा होकार दिल्याचे आमदार मुटकुळे यांनी सांगितले.
पुसेगाव येथे उभारण्यात आलेल्या श्री 1008 भगवान बाहुबली मूर्ती तयार करण्याचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू होते. राज्यातील पहिल्या क्रमाांकाची 51 फुटाची मूर्ती उभारण्यात आली आहे. पुसेगाव येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा दरम्यान भगवंतांचा महामस्तक अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महोत्सव समितीच्या वतीने जय्यत तयारी केली जात आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित राहावे, यासाठी गुरूवारी दिल्ली येथे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात महोत्सव समितीचे अध्यक्ष जेतेंद्र छाबडा, कार्याध्यक्ष रविकुमार कान्हेड, महावीर बडजाते, अजय जैन यांची उपस्थिती होती. ना.शहा यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. शिष्टमंडळाच्या वतीने आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांचा सत्कार केला.