हिंगोली: विहिरात उडी मारलेल्या पत्नीला वाचवताना पतीचाही मृत्यू
हिंगोली; पुढारी वृत्तसेवा: हिंगोली शहरालगत प्रवीणनगर परिसरात विहिरीत उडी मारलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा पत्नीसह पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२६) सकाळी ११ च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बळसोंड परिसरातील प्रवीणनगर भागात शेख मुन्ना शेख इस्माईल (वय 25) हे पत्नी शेख सुमेराबी शेख मुन्ना (वय 20) आणि लहान मुलीसोबत राहतात. आज सकाळी शेख मुन्ना व त्यांची पत्नी शेख सुमेराबी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यामुळे संतापलेल्या शेख सुमेराबी यांनी थेट परिसरात असलेल्या विहिरीत उडी मारली.
दरम्यान, पत्नी शेख सुमेराबी यांनी विहीरीत उडी मारल्याचे लक्षात येताच शेख मुन्ना हे त्यांच्या पाठीमागेच गेले. त्यांनी पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जणांनी विहिरीत उडी मारून दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेख मुन्ना यांचा मृतदेह बाहेर काढता. तोपर्यंत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शामराव डोंगरे, उपनिरीक्षक युवराज गवळी, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर, रमेश जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शेख सुमेराबी यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात नेले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

