Maharashtra Farmer Aid | अनुदानावर संताप; शेतकऱ्यांने मुख्यमंत्र्यांनाच पाठवला ५ हजारांचा धनादेश!

हिंगोलीतील गोरेगावच्या शेतकऱ्यांचा अनोखा निषेध; ‘मुख्यमंत्री साहेब, तुम्हीच पाच हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा!’
  Maharashtra Farmer Diwali Aid
Maharashtra Farmer Diwali AidPudhari
Published on: 
Updated on: 

Maharashtra Farmer Diwali Aid

गोरेगाव, हिंगोली : राज्य सरकारकडून दिवाळीसाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याचा आरोप करत गोरेगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या मदतीबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावे पाच हजार रुपयांचा धनादेश पोस्टामार्फत पाठवला. ‘पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? तुम्हीच या रकमेत दिवाळी साजरी करून दाखवा,’ असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महागाईच्या काळात पाच हजार रुपये पुरणार कसे?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल, साखर, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना शेतकऱ्यांसमोरही कुटुंबाचा सण साजरा करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत मुला-बाळांसाठी नवीन कपडे खरेदी करणे, दिवाळीचा फराळ तयार करणे आणि इतर सणासुदीचे खर्च भागवणे पाच हजार रुपयांत कसे शक्य होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

  Maharashtra Farmer Diwali Aid
Hingoli News : फटाका गोदाम अवैधच : जिल्हाधिकारी

शेतीचा वाढता खर्च अन् आर्थिक संकट

शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणी यांमुळे शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. त्यात दिवाळीसारखा महत्त्वाचा सण साजरा करण्यासाठी मिळणारी मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. संपूर्ण कुटुंबाच्या सणाचा खर्च पाच हजार रुपयांत भागवणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या मदतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीतून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार नसतील, तर अशा मदतीचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी केला. याच नाराजीतून गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश थेट मुख्यमंत्र्यांना पाठवून शासनाच्या मदतीचा निषेध केला.

  Maharashtra Farmer Diwali Aid
Hingoli News : सफाई टेंडर दीड कोटीचे; शहर मात्र घाणीतच

‘मुख्यमंत्री साहेब, तुम्हीच पाच हजारांत दिवाळी साजरी करा!’

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या धनादेशातून शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव सरकारला करून देण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ तुटपुंजी आर्थिक मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या वास्तविक गरजा आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ठोस मदत करावी, तसेच त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी या निषेधातून करण्यात आली आहे.

गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीची राज्य सरकार दखल घेणार का आणि त्यांच्या मागण्यांवर कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news