

Vasmat Former MLA Panditrao Deshmukh
वसमत : वसमत तालुक्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, माजी आमदार तथा हुतात्मा बहीर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव आणि जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. पंडितरावजी रामराव देशमुख (गुरुजी) यांचे नांदेड येथील रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
मूळचे हट्टा येथील रहिवासी असलेले गुरुजी हे अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात हुतात्मा बहीर्जी शिक्षण संस्थेमध्ये वसमत येथे मुख्याध्यापक म्हणून केली. या काळात त्यांनी फक्त शाळा न चालवता विद्यार्थ्यांशी व पालकांशी जिव्हाळ्याची नाळ जोडली. ग्रामीण भागातील पालकांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी अनेक पालक मेळावे आणि जनजागृती कार्यक्रम घेतले, ज्यामुळे शेकडो गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले.
त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा मोठा पगडा होता. १९७८ ते १९८० या काळात ते जनता पार्टीच्या तिकिटावर बसमत (आताचे वसमत) विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आमदारकी मिळाल्यापासून ते आजपर्यंत ते निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून जगले, याची संपूर्ण वसमत तालुक्यात चर्चा आहे. यासोबतच त्यांनी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून शेतकऱ्यांसाठीही काम केले.
त्यांच्या जाण्याने वसमत तालुक्यातील शिक्षण, सहकार आणि राजकीय क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. विविध पक्षाचे नेते, शिक्षक, विद्यार्थी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.