

Hingoli fire tragedy: The deceased have been identified
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सोमवारी रात्री शहरातील मारवाडी गल्लीत फटाके ठेवलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यातील मयतांची ओळख बुधवारी पहाटे पटली. यामध्ये घरमालक विजय रामकृष्ण बासटवार वय 75 वर्ष व अविनाश काशिनाथ बांगर वय 25 वर्ष यांचा समावेश आहे तर इतर 13 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघा गंभीर जखमींना लातूर व संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार 15 लाखांचे नुकसान झाले आहे.
शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्याच्या गोदामाला सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले होते. आग विझविताना फटाक्यांच्या स्फोटामुळे अग्निशमन दलाचे वाहनही जळून खाक झाले तसेच काही दुचाकी वाहने देखील जळाली.
जखमींना उपचारासाठी हिंगोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापैकी तिघांना लातूर व संभाजीनगर येथे हलविण्यात आले. जखमींमध्ये आकाश पंडित सांगळे, श्रावणी राजगोपाल बासटवार, राजगोपाल विजयकुमार बासटवार, कपिल जुगलकिशोर खंडेलवाल, भरत चौधरी, आमिश चौधरी, दिलीप दोडके, रवी कांबळे, कृष्णा अग्रवाल, सुशील बांगर, अनुप अग्रवाल यांचा समावेश आहे.