Hingoli rain news | मान्सून प्रतिक्षात खरिपाची पेरणी लांबणीवर पडली

पावसाचे दुसरे आर्द्रा नक्षत्रास आठ दिवस झाले पण पाऊस नसलयाने पेरणीस विलंब होत आहे
Monsoon Delay
Monsoon DelayPudhari
Published on
Updated on

जवळाबाजार: खरिपाच्या पेरणीसाठी मृग नक्षत्रात पुरेसा पाऊस होईल, या आशेने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर तयारी पूर्ण केली होती. मात्र, मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्राचे आठ दिवस उलटूनही पावसाचा पत्ता नाही. मान्सून रेंगाळल्यामुळे पावसाची दोन नक्षत्रे संपत आली असून, पेरणीचा हंगाम हातातून निसटत चालला आहे. आता सर्वांचे लक्ष ६ जुलैला सुरू होणाऱ्या 'पुनर्वसू' नक्षत्राकडे लागले आहे.

Monsoon Delay
Latur News : पावसाअभावी शेतकरी चिंताग्रस्त; पेरणी कधी होणार?

हवामान खात्याकडून वर्तवण्यात येणाऱ्या विविध अंदाजांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. जर वेळीच पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, तर यंदाही पेरणीला मोठा विलंब होईल, अशी भीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरणी लांबल्यास त्याचा थेट फटका पिकांच्या उत्पादनावर बसतो. शेतकऱ्यांचे संपूर्ण वार्षिक आर्थिक नियोजन, शेतीचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या हंगामावरच अवलंबून असतो.

Monsoon Delay
Beed Farmer Crisis : मृग कोरडा, आर्द्रकडे आशेने नजर; पावसाअभावी शेतकऱ्यांची वाढली धडधड

सध्या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण राहत असले तरी, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आर्द्रा नक्षत्र संपण्याच्या उंबरठ्यावर असताना जर पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला, तर पेरणीचे नियोजन करणे शक्य होईल. तसेच, या पावसाचा फायदा भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठीही होईल. सध्या आषाढी एकादशी जवळ येत असून, या पवित्र पर्वापर्यंत पावसाने हजेरी लावावी आणि शेतकऱ्यांचे पेरणीचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना बळीराजा निसर्गाकडे करत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणात वरुणराजा कधी प्रसन्न होतो आणि जोरदार पावसाची सुरुवात कधी होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news