कळमनुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वारंगा मसाई येथील शेतकऱ्याच जांभरून शिवारातील शेतातील आखाड्यावर कुऱ्हाडीने वार करून खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तालुक्यातील वारंगा मसाई येथील साहेबराव गिराम (६५) यांचे जांभरून शिवारात सुमारे ८ एकर शेत आहे. सध्या शेतात कापसाचे पिक आहे. शेतातील कापूस वेचणी करून ठेवल्यामुळे ते सोमवारी रात्री जेवण करून जागरणासाठी शेतात गेले होते दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा शेतात गेला असतांना साहेबराव गिराम हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
या घटनेमुळे घाबरलेल्या मुलाने या घटनेची माहिती तातडीने घरी कळविली. त्यानंतर त्यांचे कुटुंबिय व गावकरी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपाधिक्षक भुसारे, कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार एस. पी. सांगळे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे यांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.

