

औंढा नागनाथ : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शिवारात शेतकऱ्यांवर हल्ला करून लुटमार करणाऱ्या चौघांपैकी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि औंढा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवारी (दि. २६ जुलै) अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला काही मुद्देमाल जप्त केला असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
२० जुलै रोजी पहाटे शिरला तांडा शिवारातील एका शेतातील आखाड्यावर चार चोरट्यांनी शेतकरी आणि त्याच्या पत्नीला मारहाण करून सुमारे १ लाख रुपये किमतीचे दागिने लुटले होते. या घटनेनंतर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असतानाच, दोन दिवसांपूर्वी औंढा नागनाथ शिवारातील दोन आखाड्यांवरही अशाच प्रकारे शेतकऱ्यांना मारहाण करून महिलांच्या अंगावरील ५० हजार रुपयांचे दागिने लुटण्यात आले.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान, हिंगोली तालुक्यातील दोन संशयित सोने विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा टाकून अनिल काळे आणि अशोक काळे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेला काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू ठेवला असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.