

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे शेतातील सामाईक विहिरीचे पाणी आणि जमिनीच्या वादातून पुतण्यानेच काका आणि काकूवर चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, वडद येथील रहिवासी त्र्यंबक चोपडे (वय ५५) आणि त्यांचा पुतण्या देवेंद्र चोपडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीवरून वाद सुरू होता. त्यांच्या शेतात सामाईक विहीर असून पिकांना पाणी देण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. यापूर्वी किरकोळ वादांनंतर मध्यस्थांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात येत होता.
दरम्यान, रविवारी त्र्यंबक चोपडे हे शेतात कामासाठी गेले असता, पुतण्या देवेंद्र तिथे पोहोचला. त्याने काकांशी वाद घालत अचानक सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्यावर सलग वार केले. अनपेक्षित हल्ल्यामुळे त्र्यंबक यांना प्रतिकाराची संधी मिळाली नाही आणि ते जागीच कोसळले. काकांचा शेतातच मृत्यू झाल्यानंतर देवेंद्र थेट गावात आला आणि त्याने त्र्यंबक यांचे घर गाठले. मुलगा बाहेरगावी गेला असल्याने घरात त्र्यंबक यांच्या पत्नी मंगलाबाई चोपडे या एकट्याच होत्या.
सुडाने पेटलेल्या देवेंद्रने घरात घुसून मागचा पुढचा कोणताही विचार न करता काकू मंगलाबाई यांच्यावरही चाकूने प्राणघातक वार केले. गंभीर जखमी झालेल्या मंगलाबाई यांचाही जागीच तडफडून मृत्यू झाला. दुहेरी हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपी घटनास्थळीच थांबून होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक अय्यूब शेख, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, श्रीधर वाघमारे, जमादार रवीकांत हरकाळ, ओंकारेश्वर रांजणीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी देवेंद्र याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मयत त्र्यंबक आणि मंगलाबाई यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जवळा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. या भयानक दुहेरी हत्याकांडामुळे औंढा नागनाथ तालुक्यासह संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.