

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नवलगव्हाण शिवारात एका को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ४५ वर्षीय मॅनेजरचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि. ५) उघडकीस आली. मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. चंद्रशेखर जानकीराम थोरात (वय ४५ वर्षे रा. गोकुळधाम सोसायटी एनटीसी हिंगोली) असे मृत्यू झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. हिंगोली येथे हिंगोली अर्बन महिला को- ऑप क्रेडिट सोसायटीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, नवलगव्हाण शिवारात रेल्वे पटरीवर मृतदेह असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब फड, पोलिस अंमलदार अंकुश बांगर, नितीन हक्के, रेल्वे पोलिस रहेमत आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविली असता हा मृतदेह चंद्रशेखर थोरात यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, हिंगोली अर्बन महिला को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षाच्या पतीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे क्रेडिट सोसायटीत अपहार झाल्याचा आरोप करीत अनेक ग्राहकांनी खात्यातून पैसे काढण्यासाठी क्रेडिट सोसायटीत गर्दी केली होती. चंद्रशेखर थोरात यांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाल्यानंतर बँकेत अपहार तर झाला नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
हिंगोली अर्बन महिला को- ऑप क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांकडून ठेवी काढण्यासाठी रोज गर्दी होत आहे. मात्र बँकेच्या अध्यक्षांच्या पतीच्या प्रकृतीच्या कारणावरून या ठेवी मिळण्यास अडचणी येत आहेत. या ठेवी अनेक ठिकाणी गुंतवणूक केलेल्या असल्याने ग्राहकांना परत करणे शक्य होत नाहीत. शिवाय कर्ज वाटप केलेले असल्यानेही ठेवी देता येत नसल्याने बँकेचे अधिकारी व कर्मचारी मागील काही दिवसांपासून तणावाखाली वावरत होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची चर्चा होत आहे. तर ठेवीदार मात्र आता हैराण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणखी एक क्रेडिट सोसायटी डबघाईस येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा