

Aundha Panchayat Samiti staff appointments
औंढा नागनाथ : पंचायत समितीच्या 57 लाख रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात चार कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर पंचायत समिती लेखा विभागाचा कारभार सुरळीत चालू राहण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून नवीन चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
औंढा पंचायत समितीच्या लेखा विभागामध्ये राहुल बोईनवाड, राजेश बाहेती, श्याम पारडे, व प्रमोद मस्के या चौघांना तात्पुरता पदभार दिल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी नुकतेच काढले असून औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात एका वर्षात तब्बल 57 लाख रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचे जिल्हा परिषद लेखा विभागाच्या तपासणीमध्ये स्पष्ट झाले होते.
या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली होती, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश लेखा विभागाला दिले होते. त्यानुसार मुख्य लेखा वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी कारवाईचा प्रस्ताव सादर केल्यावरून लेखा विभागातील कर्मचारी के एन इंगोले, जी. एन. वाघमारे, व्ही. एन. मुळे यांना निलंबित केले.
तर नितीन शर्मा यास यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते . दरम्यान पंचायत समितीच्या लेखा विभागातील कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे चार पदे रिक्त झाली होती. त्यामुळे नागरिकांचे कामे खोळंबून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती याशिवाय योजनांचा निधीही खर्च करण्यास कठीण झाले होते.
त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजात सुलभता यावी, यासाठी वसमत पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी राहुल बोईनवाड, जिल्हा परिषद लेखा विभागातील कनिष्ठ लेखा अधिकारी राजेश बाहेती, महिला बालकल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लेखा श्याम पारडे, अर्थ विभागातील कृषी कनिष्ठ सहायक प्रमोद मस्के यांना औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यामुळे लेखा विभाग सुरळीत काम करेल असे दिसून येत असून विविध योजना व ग्रामस्थांचा निधी लवकरच मार्गी लागणे ची शक्यता निर्माण झाली आहे.