

Aundha Nagnath Jintur Road Bike Collision
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव जवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस व रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली . जखमीस हिंगोली येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु, डॉक्टरांनी शेख उस्मान व रोहित राठोड या दोघांना मृत घोषित केले. तर राज राठोड, अर्जुन राठोड हे गंभीर जखमी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीवरून चालक आणि सोबतचे दोघेजण असे एकूण तिघेजण जिंतूर कडून औंढा नागनाथ कडे येत असताना समोरून एक दुचाकी औंढा नागनाथवरून जिंतूरकडे जात होते. यावेळी समोरासमोर दोन्ही दुचाकींची जोराची धडक होऊन यात एका दुचाकीवरील तिघे व एका दुचाकीवरील एक असे एकूण चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींच्या डोक्याला, पायाला, छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय औंढा येते पाठविण्यात आले.
गंभीर जखमी झाल्यामुळे प्रथम उपचार करून औंढा नागनाथ येथून जखमींना जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे पाठवण्यात आले . औंढा नागनाथ पोलीस व राज्य महामार्ग पोलीस एएसाय खतीब व बाळू कदम यांनी दोन्ही मोटर सायकलसह जखमींना उपचारास पाठवून वाहतूक सुरळीत केली.