Hingoli Accident : कामावरून परतताना काळाचा घाला, भरधाव कार खड्ड्यात आदळून उलटली, दोघे ठार, एक गंभीर जखमी

Accident
Published on
Updated on

हिंगोली : औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर करंजाळा पाटी जवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी घडली. अपघातातील दोन्ही मृतदेह औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील ओमकार गिऱ्हे (२७) श्रीधर ढेगळे (३३ रा. राजापूर) व किशोर खरात (रा. नागेशवाडी) हे जेसीबी चालविण्याचे काम करतात. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तिघेही एका कारने परभणीकडे कामाच्या निमित्ताने गेले होते. त्या ठिकाणी काम आटोपून सायंकाळच्या सुमारास परभणी येथून औंढा नागनाथकडे येत होते. यावेळी हट्टा ते औंढा नागनाथ मार्गावर करंजाळा पाटी जवळ त्यांची कार खड्यात आदळली.

त्यामुळे कार चालक ओमकार याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. या अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर, जमादार हिरामन चव्हाण, कृष्णा चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने ओमकार व श्रीधर यांना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले तर किशोर यांना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयाच्या वैैद्यकिय अधिकाऱ्यांनी ओमकार व श्रीधर यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या घटनेमुळे गोळेगाव व राजापूर गावावर शोककळा पसरली आहे. मयत ओमकार यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी एक मुलगा असा परिवार आहे. तर मयत श्रीधर यांच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी एक मुलगी असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news