हिंगोली: औंढा नागनाथ येथे फायनान्स कंपनीला १३ लाखांचा चुना लावून वसुली एजंट पसार

file photo
file photo

औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा :  एका फायनान्स कंपनीत वसुली एजंट म्हणून नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याने ग्राहकांकडून कर्जाच्या पोटी वसूल केलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार करून कंपनीची १३ लाख १२ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. साहेबराव मोतीराम टोम्पे असे वसुली कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औंढा नागनाथ येथे इंडसन इम्युजन लिमिटेड फायनस कंपनीची उपशाखा कार्यरत आहे. भारत फायनान्स कंपनीच्या नावाखाली महिला बचत गटांना व इतरांना व्यावसायिक कर्ज दिले जाते. कर्ज वसुलीसाठी कंपनीने काही वसुली एजंट नियुक्त केले आहेत. वसुली कर्मचारी साहेबराव टोम्पे यांनी कंपनीच्या ग्राहकांकडून ऑगस्ट २०२२ ते २० जून २०२३ या कालावधीत कर्जाचे हप्ते वसूल केले. परंतु वसूल केलेली १३ लाख १२ हजार, ७०० रुपयांची रक्कम कंपनीकडे जमा न करता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरली.

या प्रकरणी देवजना येथील राष्ट्रपाल सुभाष चोपडे यांनी औंढा पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.३) फिर्याद दिली होती. त्यानंतर साहेबराव टोम्पे याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मिथुन सावंत करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news