Heavy Rainfall Hingoli : जवळाबाजार, गोरेगाव परिसरात मुसळधार पाऊस; ओढ्यांना पूर, बाजारपेठेत पाणी साचले

Hingoli flood news : जवळाबाजार ते पुरजळ मार्ग वसमत ओढ्याला पूर
Hingoli flood news
Hingoli flood news
Published on
Updated on

जवळाबाजार: परिसरात जवळपास 5 ते 6 तास जोरदार पाऊस झाला. पहिल्याच पावसामुळे जवळाबाजार ते पुरजळ (वसमत जाणारा) मार्गावरील ओढ्याला पूर आल्याने अनेक तास वाहतूक बंद होती.

जवळाबाजार परिसरात ३० जुलै रोजी सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली होती. दुपारपर्यंत पाऊस सुरू होता; काही वेळेस जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जवळाबाजार ते पुरजळ मार्गावर पुरजळ जवळील ओढ्याला पावसाने पूर आल्याने बरेच तास या मार्गावर वाहतूक बंद होती. हा मार्ग पुढे वसमतकडे जात असल्याने, जवळाबाजार परिसरातून पुरजळमार्गे वसमत जाणारी वाहतूक ओढ्यावरील पुलाच्या पाण्यामुळे पूर्णपणे ठप्प झाली होती.

परिसरात या वर्षीचा हा पहिलाच जोरदार पाऊस झाल्यामुळे परिसरातील ओढ्यांना व नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरला आहे. सध्याच्या परिस्थितीत परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असून अद्यापही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

जवळाबाजार परिसरात मुसळधार पाऊस पडला

जवळाबाजार :

जवळाबाजार परिसरात मागील दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता. ३० जुलै रोजी सकाळपासूनच परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस खरीप हंगामातील पिकांना अतिशय उपयुक्त ठरला आहे.

सकाळी ८ पासून सलग दुपारी दोन वाजेपर्यंत परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते आणि रिमझिम पाऊस पडत होता; परंतु, आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग ७ तासांपासून परिसरात जोरदार पावसाचे आगमन सुरूच होते. यामुळे खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरला आहे.

गोरेगाव बाजारपेठेत पावसामुळे रस्त्यावर साचले पाणी; शाळकरी मुलांना त्रास

गोरेगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोरेगावच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.

बाजारपेठेतील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे पादचाऱ्यांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. शाळकरी मुलेही छत्री आणि रेनकोट घालून पाण्यातून शाळेत जाताना दिसत आहेत.

स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला लवकरात लवकर नालेसफाई आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. "थोडा पाऊस पडला की अशीच परिस्थिती होते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे," अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news