आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बोर्डावाडी येथील हळद पिकामध्ये लावलेली गांजाची १३९ झाडे जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांना बुधवारी (दि. २३) ही कारवाई केली. यामध्ये सुमारे पावणेतीन लाखाचा २८ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी विष्णू जयाजी ढोकणे (वय २८) रा. बोर्डा यांना अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला याप्रकरणाची गुप्त माहिती मिळाली होती. विक्रम विठूबोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोर्डा येथील आरोपी विष्णू जयाजी ढोकणे यांनी बोर्डवाडी शिवारामध्ये गट क्रमांक ५८ मधील हळद पिकामध्ये १४९ गांजाच्या झाडांची लागवड केली होती. पोलिसांनी २ लाख ८९ हजार ६०० रुपये किंमतीची सर्व झाडे जप्त केली. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, प्रेम चव्हाण जमादार शिवाजी पवार, राजू ठाकूर वाव्हळे, स्वामी, आदी पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली.