

सेनगाव : शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी सुरू करण्यात आलेल्या 'मानव विकास' योजनेच्या बसचा चालक चक्क मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (दि.२७) सेनगाव तालुक्यात उघडकीस आला. विद्यार्थिनींचे प्रसंगावधान आणि दाताडा बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. या प्रकारानंतर संतप्त पालकांनी संबंधित चालकावर कडक कारवाई करून त्याला तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कोळसा, सेनगाव, सापडगाव, सुकळी, दाताळा बुद्रुक, दाताडा खुर्द, वटकळी या मार्गावर मानव विकासची बस धावते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही बस विद्यार्थिनींना घेऊन दाताडामार्गे वटकळीच्या दिशेने जात होती. प्रवासादरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे काही विद्यार्थिनींच्या निदर्शनास आले. धोका ओळखून विद्यार्थिनींनी तात्काळ चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडले.
दरम्यान, दाताडा बुद्रुक येथील नागरिकांनाही बस अडवून बसच्या चालकाला खाली उतरवून जाब विचारला. विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी चालकावर कठोर कारवाईची मागणी करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी यावेळी केली.