

Maharashtra Legislative Council
हिंगोली: राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या कामकाजा दरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांची विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड जाहीर केली.
महाराष्ट्र विधीमंडळच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली असून, अधिवेशनासाठी विधान परिषदेच्या तालिक सभापती आ.डॉ. सातव यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यांनी आपल्या आजवरच्या कार्यकाळात जिल्ह्यातील व राज्यातील जनसामान्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच अनेक प्रश्न मार्गीही लावले होते. त्यांनी आजपर्यंत सभागृहात केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यातही आले होते.
आ. सातव यांनी आजपर्यंत सभागृहात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा, फळपीक विमा, शेतीमालाचे पडलेले बाजारभाव, हमीभाव, पीककर्ज, सोयाबीनसाठी वाढीव अनुदान, शेतीसाठी नवीन ट्रान्सफार्मर्स देणे, प्रलंबित असलेले विजेचे प्रश्न, शिक्षण विभागातील रिक्त जागा, वैद्यकीय महाविद्यालय व सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांची शिताफीने उकल करुन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.या निवडीबद्दल सभागृहाच्या सदस्यांनी निवडीनंतर आ. सातव यांचे अभिनंदन केले.