

Beed, Hingoli districts hit by unseasonal rains
आडगाव रंजे, पुढारी वृत्तसेवा :
वसमत तालुक्यातील आडगाव रंजे परिसरात सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये हरभरा, गहू, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एका संकटात सापडला आहे.
परिसरात सोमवारी दुपारपासून अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. याच दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये उभे असलेल्या गह, ज्वारी, हरभरा ही पिके अक्षरशा भुईसपाट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दोन-तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी ज्या पिकाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले, तेच एक क्षणात भुई सपाट होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. खरीप हंगामाचा पीकविमा मंजूर होऊनही अद्यापही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्याची अद्यापही प्रतीक्षाच आहे.
बीड, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी झालेल्या तुरळक गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काल आणि आज झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका तसेच आंबा बागांना
फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागांत वाऱ्याच्या जोरदार झोतांसह झालेल्या पावसामुळे ज्वारी, गहू व मका पिके आडवी पडली. आंबा बागांमध्ये फुलोरा व लहान फळांची गळ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अचानक बदललेल्या हवामानामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई व परळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना दूरध्वनीद्वारे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांकडून नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.