

औंढा नागनाथ : येथे गेल्या दोन-तीन दिवसापासून सततधार पावसामुळे औंढा नागनाथ येथील सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यातच गावातील उजव्या बाजूकडे असलेले रामकुंड तलाव हा ओव्हरफ्लो झाला असल्याने त्यातील पाण्याचा विसर्ग हा बाहेर काढण्यात आला आहे. या पाण्याच्या विसर्गाने नालीतून जाण्यासाठी रस्ता नसल्याने सदर पाणी अगदी महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहत आहे या पाण्याबरोबर तलावातील छोटे मासे प्रवाह नुसार वाहत महामार्गावरून जात आहेत. ते मासे पकडण्यासाठी लहान लहान मुले अगदी महामार्गावर मासे पकडण्याची स्पर्धा लावीत आहेत यामध्ये छोटे छोटे मुलं व तरुणही सहभागी होत आनंद लुटत आहेत.
पण यामुळे वाहने चालविणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास तर होतोच आहे शिवाय त्याहीपेक्षा जास्त त्रास हा पायी चालणाऱ्या लोकांना होत आहे. कारण येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे सर्व पाणी उडून हे लोकांच्या अंगावर जात आहे शिवाय या पाण्याच्या प्रवाहामुळे हिंगोली मार्गे जाणाऱ्या डाव्या साईड वरील व्यवसायिक लोकांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत कारण कोणीही पाण्यात पाय बुडून या व्यवसायिकांकडे जाण्याऐवजी दुसरीकडे जाणे पसंत करत आहेत. या पाण्याचा विसर्ग होत हेच पाणी पोळा मारुती मंदिरापासून अगदी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्याही पलीकडे जात आहे यामुळे बस स्थानकात ये जा करण्यासाठी सुद्धा याच पाण्यामधून ये जा करावी लागत आहे .
त्यातच औंढा नागनाथ येथील बांधकाम विभागाच्या अगदी समोरच महामार्गावर मोठे खड्डे पडल्याच्या मुळे इथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असल्यामुळे पाण्यामुळे त्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे इथे अपघाताची संख्या वाढत आहे तर अनेक वाहने मधीच बंद पडल्याचे दिसून येत आहेत या खड्ड्यांमधून जवळपास एक ते दीड फूट पाणी साचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तरी इथून वाहने चालविणे जिकरीचे झाले आहे पण नाईलाजास्तव हा महामार्ग असल्यामुळे वाहनाची वर्दळ येथे सतत असते.
बांधकाम विभागाच्या अगदी समोरील मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तरीही मात्र बांधकाम विभागाकडून कुठल्याही हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच दोन्ही बाजूला असलेले मोठ्या मोठ्या खड्ड्यांमधून जाऊ नये म्हणून अनेक लोक एकमेकांना सावध करीत असले तरीही मात्र तरीही मात्र बांधकाम विभागाकडून सदर कामाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शिवाय या मार्गावर पाणी जाण्यासाठी नाल्या नसल्याने पाणी वर येते असल्याचे स्पष्ट दिसून येत आहेत. या बाबीकडे बांधकाम विभाग यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी औंढा नागनाथ येथील सामान्य जनतेत होत आहे .