

हिंगोली, : अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. याबाबत विविध प्राप्त तक्रारींच्या आधारे 10 मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार विविध बाबींची पडताळणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, निकृष्ट दर्जाच्या खव्याचे सात नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेला 93 किलोचा साठा नष्ट करण्यात आला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
औंढा नागनाथ येथील अन्न व्यावसायिक हे वसमत येथील व्यावसायिकांकडून खवा खरेदी करून विक्री करत असल्याचे या तपासणीत निदर्शनास आले. त्यानुषंगाने वसमत येथेही विशेष पथक पाठवून पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घोपे, श्रीमती सावंत, वैभव ठोंबरे, कृष्णा मुळे यांनी सहायक आयुक्त खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांची खरेदी करण्याचे तसेच कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाला त्वरित कळविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग, छत्रपती संभाजीनगरचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी केले आहे.