

औंढा नागनाथ: तीर्थक्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ येथील बस स्थानकाचे नूतनीकरण अलीकडेच मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात झालेल्या कामाचा दर्जा पाहता 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. विशेषतः बस स्थानक परिसरात वीज जोडणीसाठी टाकण्यात येत असलेली विद्युत केबल अत्यंत धोकादायक पद्धतीने टाकली जात असल्याने भविष्यात मोठ्या अपघाताची टाकाऊ शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नियमानुसार, वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणी घेताना संबंधित थ्री-फेज केबल किमान एक फूट खोलीवर टाकणे आवश्यक आहे. मात्र, बस स्थानकावरील गुत्तेदाराने केवळ एक ते दोन इंच चर खोदून ही केबल अंथरली आहे. यावर तातडीने सिमेंट टाकून निकृष्ट काम लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वरवर सिमेंट असल्याने भविष्यात वजन पडल्यास किंवा झीज झाल्यास विद्युत प्रवाह बाहेर येऊ शकतो. पावसाळ्यात किंवा ओलाव्यामुळे बस स्थानक परिसरात शॉर्ट सर्किट होऊन प्रवाशांना जीव गमवावा लागण्याची भीती आहे.
नूतनीकरण होऊनही प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली आहे. बस स्थानकावर प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. परिसरात सर्वत्र केरकचरा साचला असून स्वच्छतेचा पूर्णपणे बोजावारा उडाला आहे. स्थानकात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गुत्तेदार केवळ आपले खिसे भरण्यासाठी मनमानी पद्धतीने निकृष्ट काम उरकत आहे. या गंभीर प्रकाराकडे राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित गुत्तेदारावर कारवाई करावी आणि विद्युतवाहिनीचे काम नियमानुसार पुन्हा करून घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.