

Sant Gajanan Maharaj Palkhi
औंढा नागनाथ : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. ३) सकाळी सुमारे ११ वाजता औंढा नागनाथ शहरात उत्साहात आगमन झाले. "ज्ञानबा-तुकाराम"च्या जयघोषासह टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.
पालखी शहरात दाखल होताच पालखी मार्गासह घराघरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत करण्यात आले. पोलिस ठाणे, कासार गल्ली, रहीम चौक, जोशी गल्ली, नगरपंचायत रोड, डॉ. हेडगेवार चौक आणि स्व. मीनाताई ठाकरे चौक मार्गे पालखीचे आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात आगमन झाले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी पालखीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. देवस्थानचे अधीक्षक वैजेनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, माजी आमदार डॉ. संतोष टारफे तसेच नंदकुमार पाटील यांनीही पालखीचे दर्शन घेतले.
दिंडीतील वारकऱ्यांसाठी भक्त निवास क्रमांक दोन येथे नंदकुमार (नंडू) पाटील यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच गलांडी फाटा, पिंपळदरी फाटा आदी ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. भोजनानंतर दुपारी सुमारे २ वाजता श्री संत गजानन महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी जवळा बाजारकडे रवाना झाली.
टाळ-मृदंगाच्या गजराने श्रीक्षेत्र पंढरपूर मार्ग भक्तिमय
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचा ओघ; ठिकठिकाणी सेवा उपक्रमांना वेग
जवळा बाजार : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून वारकऱ्यांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून जवळा बाजार मार्गावर लहान-मोठ्या दिंड्यांचा अखंड प्रवास सुरू असून टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक पायी दिंडी आणि विविध वाहनांतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ मनात बाळगून वारकरी नामस्मरण, भजन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात वाटचाल करत आहेत.
जवळा बाजार मार्गावर सकाळपासून सायंकाळपर्यंत वारकऱ्यांची सतत वर्दळ दिसून येत आहे. दिंड्या नियोजित मुक्काम करत पुढील प्रवास सुरू ठेवत असून मार्गावरील वातावरण पूर्णपणे भक्तिरसाने न्हाऊन निघाले आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी मार्गावरील विविध गावांमध्ये आणि सामाजिक संस्थांकडून चहा, नाश्ता, भोजन, पिण्याचे पाणी तसेच रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवा उपक्रमांत स्थानिक नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून वारकरी सेवेचा लाभ घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पुढाकार घेत आहेत.
एकंदरीत, आषाढी वारीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणारा मार्ग सध्या टाळ-मृदंगाच्या गजराने आणि विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषाने भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे.