वसमत, पुढारी वृत्तसेवा : शहरातील बुधवार पेठ भागात पिस्तूल घेऊन फिरणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त केली असून याप्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पोलिस विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. यासाठी पोलिस विभागाने गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई हाती घेतली आहे. याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान पोलिस विभागाने शत्र बाळगणाऱ्यावर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. वसमत शहरातील बुधवार पेठ भागात दोघेजण पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक कपिल आगलावे, जमादार गजानन पोकळे, किशोर कातकडे, पांडुरंग राठोड, विठ्ठल काळे, किशोर सावंत यांच्या पथकाने बुधवारी रात्री दोघांचा शोध सुरू केला होता.
रात्री पोलिसांनी श्रीकांत उर्फ टील्या सांडे, शुभम पतंगे (रा. बुधवार पेठ वसमत) या दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २५ हजार रुपये किमतीची पिस्टल आढळून आले. पोलिसांनी पिस्टल जप्त करून दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के पुढील तपास करीत आहेत. या दोघांनी पिस्टल कुठून आणले याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यामध्ये तलवार, खंजर, चाकू, पिस्टल, गुप्ती आदी शस्त्र बाळगणार्या संशयितांची पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही दिवसातच त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.