

Adhik Maas 2026 Marriage Season Delay
जवळाबाजार : अधिक मासाला १५ मेपासून सुरुवात होत असल्याने आगामी एक महिनाभर शुभविवाहासाठी मुहूर्त उपलब्ध नसणार आहेत. त्यामुळे विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक भावी वधू-वरांना आता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्या अधिक मास सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने गावोगावी विवाहसोहळ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत विवाह समारंभांचे आयोजन होत असून मंगल कार्यालये, बॅण्ड पथके, केटरिंग व्यावसायिक, फोटोग्राफर तसेच शूटिंग करणाऱ्या टीमची मोठी धावपळ सुरू आहे.
दरम्यान, नातेवाईक, मित्रमंडळी आणि लोकप्रतिनिधी यांनाही एका दिवसात अनेक विवाहसोहळ्यांना उपस्थित राहावे लागत आहे. वधू-वरांसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. मात्र १५ मेनंतर अधिक मास सुरू होताच विवाहसोहळ्यांना जवळपास महिनाभर विराम मिळणार असल्याने या सर्व मंडळींनाही धावपळीतून काहीसा आराम मिळणार आहे.
जून महिन्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू होते, तसेच शाळाही सुरू होत असल्याने पावसाळ्यात विवाहसोहळे टाळण्याकडे अनेक कुटुंबांचा कल असतो. जरी जून आणि जुलै महिन्यात काही विवाहमुहूर्त असले तरी पावसाळ्यामुळे अनेक जण विवाहाचे आयोजन पुढे ढकलतात.
एकंदरीत, पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात विवाहसोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर दिवाळीपर्यंत विवाहसमारंभांना मर्यादा येण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर तुळशी विवाहानंतर पुन्हा शुभविवाह सोहळ्यांना वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.