

कळमनुरी (हिंगोली): नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून एका असहाय्य महिलेवर तब्बल तीन वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कळमनुरी तालुक्यात उघडकीस आली आहे. आरोपीला कळमनुरी पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गांगापूर येथील तरुण संजय बोक्से याने विदर्भातील एका महिलेसोबत ओळख वाढवली. त्याने स्वतः धाबा टाकणार असल्याचे सांगून त्या महिलेला कामासाठी बोलावले. पतीपासून विभक्त आणि असहाय्य असलेल्या या महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या धाब्यावर काम करण्यास सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत संजयने तिच्याशी जवळीक वाढवली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तब्बल तीन वर्षे सुरू होता. या काळात त्याने तिचे काही छायाचित्र देखील काढून ठेवले होते.
सततच्या अत्याचाराला आणि फसवणुकीला कंटाळून अखेर त्या महिलेने संजयकडे लग्नाची मागणी केली. तेव्हा मात्र त्याने आपले खरे रूप दाखवले. त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला आणि जर लग्नासाठी जास्त तगादा लावला तर काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, पीडित महिलेने धैर्य दाखवून मंगळवारी सायंकाळी थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कथन केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपाधीक्षक सुरेश दळवे आणि पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार गजानन होळकर यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी संजय बोक्से याला गावातून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.