

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील तक्रारदार व त्याच्या भावाचे बीपीएल योजनेत नाव समाविष्ट करून स्वस्त धान्याचा लाभ देण्यासाठी 3 हजाराची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८ जानेवारी) दुपारी रंगेहात पकडले.
कळमनुरी तालुक्यातील एका लाभार्थ्याने त्याचे व त्याच्या भावाच्या कुटुंबियांचे बीपीएल योजनेत नाव समाविष्ट करून स्वस्त धान्याचा लाभ देण्याबाबत तहसील कार्यालयात 18 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना शिधापत्रिका मिळाली होती. मात्र या शिधापत्रिकेवर त्यांना धान्यच मिळाले नाही. त्यावरून तक्रारदाराने पुन्हा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे वारंवार विचारणा केली. मात्र त्यांना दाद मिळाली नाही.
त्यानंतर पुरवठा विभागातील लिपीक चक्रधर कदम याने बीपीएल योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्याच्या योजनेत नाव समाविष्ट करून अन्नधान्य मिळणे बाबत अंतिम आदेश काढून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर चक्रधर याने दोन्ही प्रस्तावाचे एकूण तीन हजार रुपयांची मागणी केली.
याप्रकरणी संबंधित तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, गजानन पवार, शिवाजी वाघ, अमोल जाधव, शेख अकबर यांच्या पथकाने कळमनुरी तहसीलच्या पुरवठा विभागाच्या परिसरात सापळा रचला होता. दुपारी लिपीक चक्रधर याने तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच टेबलाच्या ड्राव्हरमध्ये टाकून घेतली त्यानंतर सदर रक्कम घेताच त्यास पकडण्यात आले. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.