

A motorcyclist was crushed to death under a tanker
आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : नांदेड-हिंगोली महामार्गावरील भाटेगाव शिवारात सोमवारी (दि. २) सकाळी १० वाजेच्या सुमारास टैंकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. पाठीमागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार चाकाखाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी बापूराव गुठे (वय ३३, रा. गुठेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते उमरखेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) लिपिक म्हणून कार्यरत होते.
शिवाजी गुढे हे सोमवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच २६ सीबी ७७३४) गुठेवाडीहून उमरखेड येथे कामावर जात होते. ते भाटेगाव जवळ आले असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या केटीएल कंपनीच्या टँकरने (क्रमांक एमएच ०४ एफडी ६६६१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शिवाजी हे खाली पडून थेट टँकरच्या चाकाखाली आले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसीन खान यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गुठेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा
नांदेड-हिंगोली महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून, वेगावर नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. भाटेगाव परिसरात वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी गतिरोधक किंवा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे