

आडगाव रंजे (हिंगोली) : परभणी - वसमत मार्गावर चिखली येथील तपासणी नाक्यावर रविवारी सकाळी आठ वाजता एका खाजगी बसची तपासणी करीत असताना एक प्रवासी घाबरला. शंका आल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी बसमधील सर्वच बॅगांची तपासणी केल्यानंतर तीन सॅक बॅगमधून तब्बल ८९.७८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्हयाच्या सिमेवर पोलिस तसेच महसूल प्रशासनाने तपासणी नाके उभारले आहेत. या चिखली नाक्यावर मुंबईकडून नांदेडकडे जाणारी खाजगी बस थांबवून तपासणी केली जात होती. पोलिस कर्मचारी गर्जे व डाखोरे यांना तपासणी करताना एक प्रवासी घाबरलेला दिसून आला. शंका आल्याने त्यांनी बसमधील सर्वच बॅगांची तपासणी सुरू केली. यातील तीन प्रवाशांच्या सॅक बॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल दिसून आले. पथकाने तीन बॅग ताब्यात घेऊन तीन प्रवाशांनाही सोबत घेतले.
या ठिकाणी सापडलेल्या तीन बॅगमधील रोकड मोजण्यासाठी मशीन आणले होते. मात्र, काही वेळातच मशीन बिघडल्यामुळे दुसरे मशीन आणण्यात आले. रोकड मोजणीस तब्बल दोन तास लागले. ही रक्कम व तीन इसमांना पथकाने वसमत येथे नेण्यात आले. स्थिर पथकाचे गंगाप्रसाद गायकवाड, सुरज शामशेटेवार, पोलिस कर्मचारी महेश गर्जे, डोखोरे, सुमेध कांबळे, पवन झंझाड यांच्यासह सीमा सुरक्षा बलाच्या चार जवानांनी ही कारवाई केली. कार्यरत होते.