हिंगोली : बोल्‍डा फाटा येथे दुकानांना आग; १० दुकाने आगीच्या भक्षस्‍थानी | पुढारी

हिंगोली : बोल्‍डा फाटा येथे दुकानांना आग; १० दुकाने आगीच्या भक्षस्‍थानी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे काल (मंगळवार) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकानांना आग लागली. या भागातील १० दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रात्री उशीरा पर्यंत कळमनुरी व हिंगोलीचे अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहेत. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा येथे बोल्डा, वाई, सिंदगी, पोतरा, शिरळी, नांदापूर, हारवाडी, येहळेगाव गवळी, पांगरा शिंदे या भागातील गावकरी बोल्डा फाटा येथे साहित्य खरेदीसाठी येतात. तर बोल्डा येथील आठवडी बाजार मोठा असल्यामुळे परिसरातील हजारो गावकरी आठवडी बाजारासाठी येतात. त्यामुळे बोल्डा येथील बाजार प्रसिद्द आहे. दरम्यान, बोल्डा फाटा येथे गावकऱ्यांची वर्दळ लक्षात घेऊन या ठिकाणी हॉटेल, ऑटोमोबॉईल्स, कापड, हार्डवेअर, सिमेंट, मोबाईल विक्रीची सुमारे १० दुकाने आहेत. या शिवाय इतर किरकोळ दुकानांचाही समावेश आहे. दिवसभर या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ असते.

दरम्यान, मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी असलेल्या हॉटेलमधून धुर निघू लागला. पाहता पाहता आगीने रौद्ररुपधारण केले. त्यामुळे आगीचे लोळ उठले. हॉटेलची आग पसरल्याने परिसरातील इतर दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली. त्यातच ऑटोमोबॉईल्स मधील ऑईल तसेच कपड्यांच्या दुकानातील कपड्यांमुळे आग अधिकच भडकत गेली. आग अन धुरामुळे गावकऱ्यांना आगीवर पाणी ओतणेही शक्य झाले नाही.

दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार रामदास ग्यादलवाड, राजीव जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी व पोलिसांनी तातडीने वसमत, कळमनुरी, हिंगोलीच्या अग्नीशमनदलास पाचारण केले. आग नेमकी कशामुळे लागली तसेच किती दुकानांचे नुकसान झाले हे स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Back to top button