हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील फायनल! शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर | पुढारी

हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील फायनल! शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : महायुती तर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी अखेर जाहीर झाली. शिवसेने तर्फे जाहीर करण्यात आलेल्या आठ उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भारतीय जनता पक्षाने करून घेतलेल्या विविध सर्वेक्षणामध्ये खा. हेमंत पाटील यांच्यावर मतदार संघात मोठी नाराजी असल्याचे भारतीय जनता पक्षातर्फे सतत सांगण्यात येत होते. यामुळे अनेक इच्छुकांनी ऐन वेळी शिवसेना शिंदे गटात जाऊन हिंगोलीची उमेदवारी मिळविण्यासाठी जोर बैठकाही सुरू केल्या होत्या. यामध्ये माजी खासदार अ‍ॅड. शिवाजी माने व काँग्रेसचे डॉ. अंकुश देवसरकर यांचे नाव आघाडीवर होते. देवसरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे असल्याने भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्ते झाल्या नंतर अशोक चव्हाणांनी देवसरकरांचे नाव रेटल्याची मतदार संघात जोरदार चर्चा होती. अगदी शेवटच्या टप्प्यात किमान हेमंत पाटील यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी सौ. राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, असाही आग्रह केला जात होता. शेवटी गुरुवारी पक्षातर्फे अधिकृतपणे हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने सर्व विषयांवर पडदा पडला.

पावणे तीन लाखांनी झाले होते विजयी

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५ लाख ८६ हजार ३१२ मते मिळवून हेमंत पाटील यांनी काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा २ लाख ७७ हजार ८५६ मतांनी पराभव केला होता. २०१४ मध्ये हेमंत पाटील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते.

हिंगोलीकरांसाठी दोन्ही उमेदवार बाहेरचे

विधानसभेच्या सहा पैकी तीन मतदार संघ हिंगोली जिल्ह्यातील असताना युती व आघाडीने दोन्ही उमेदवार नांदेड जिल्ह्यातून दिल्याने सामान्य मतदारांचा मात्र हिरमोड झाला आहे. शिवाय गैर मराठा मतदारांची मोठी संख्या असलेल्या हिंगोली मतदार संघात दोन्ही बाजुने ओबीसी नेत्यांचा विचार न झाल्याचीही चर्चा आहे.

Back to top button