Hingoli News : विदर्भातील शेतकऱ्यांची २२ लाखांची फसवणूक; वसमतच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल | पुढारी

Hingoli News : विदर्भातील शेतकऱ्यांची २२ लाखांची फसवणूक; वसमतच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा :  विदर्भातील शेतकऱ्यांची हळद खरेदी केल्यानंतर त्यांना दिलेले धनादेश वटले नाही. त्यामुळे वसमत येथील जगदंबा ट्रेडिंगचा व्यापारी व त्याचे दोन जामीनदार यांच्यावर वसमत शहर पोलीस ठाण्यात आज (दि.१५) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. Hingoli News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील बुलढाणा जिल्हयातील तसेच वाशीम जिल्हयातील १२ शेतकऱ्यांनी वसमत येथे हळद विक्री केली होती. या शेतकऱ्यांनी जगदंबा ट्रेडिंगचे मालक तथा व्यापारी बालाजी आनंदा कदम यांना हळद विक्री केल्यानंतर बालाजी याने चार ते पाच दिवसांत पैसे देण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर त्याने या शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या हळदीचे धनादेश दिले. शेतकऱ्यांनी सदर धनादेश बँकेत वटविण्यासाठी दिले असता त्या खात्यात पैसेच नसल्याने धनादेश वटले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पुन्हा वसमत येथे जगदंबा ट्रेडिंग कंपनी गाठले. मात्र, त्या ठिकाणी बालाजी कदम आढळून आला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी हिंगोलीच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकाराची चौकशीही करण्यात आली.  Hingoli News

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी या प्रकारची गंभीर दखल घेऊन बाजार समितीने सदर व्यापाऱ्याची मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे. अन्यथा बाजार समितीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर खडबडून जागे झालेल्या बाजार समितीने या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणात बाजार समितीचे सचिव सोपान शिंदे यांनी आज वसमत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बालाजी आनंदा कदम व त्याचे साक्षीदार रामेश्‍वर देविकिशन नावंदर, कोंडबा बालाजी इंगोले यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत कदम, उपनिरीक्षक राहुल महिपाळे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button