रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेकडे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांची पाठ

रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेकडे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांची पाठ

पुढारी वृत्तसेवा; हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा मागील दोन दिवस हिंगोली जिल्ह्यात असताना वसमतचे आमदार राजेश नवघरे यांनी मात्र या यात्रेकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी आमदार पवार यांची भेटही घेतली नसल्याने राजकिय वर्तुळातून तर्कवितर्क काढले जात आहे.

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांची भूमिका सातत्याने तळ्यात मळ्यात राहिली आहे. नवघरे यांनी एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपण असल्याचे सांगत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधून हजारो कोटी रुपयांचा निधी वसमत विधानसभा मतदार संघासाठी प्राप्त करून घेतला आहे. अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. तेव्हा राजेश नवघरे यांनी एक दिवस आधीच जाऊन त्यांची भेट घेतली. नंतर नियोजित कार्यक्रमाचे कारण सांगत बैठकीपासून सुटका करून घेतली. त्यावेळीच राजकीय वर्तुळात शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र दोन्ही नेते आमचेच असल्याचे सांगत आमदार राजेश नवघरे यांनी तळ्यात मळ्यातची भुमिका ठेवली. काही दिवसांपुर्वीच त्यांनी उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विकास निधी आणला तसेच सिध्देश्‍वर पर्यटन स्थळावरही बैठकीला हजेरी लावली होती. दरम्यान, आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांची संघर्ष यात्रा दोन दिवस हिंगोली जिल्ह्यात होती. त्यांनी सेनगाव तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शिवाय हिंगोली तालुक्यातील संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे भेट देऊन संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. या सर्व दोन दिवसांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मात्र वसमत विधानसभेचे युवा आमदार म्हणून ओळख असलेले आमदार राजेश नवघरे यांनी मात्र यात्रेकडे पाठ फिरवली. दोन दिवसांच्या कार्यक्रमात त्यांनी आमदार पवार यांची भेट घेण्याचे टाळल्यामुळे राजकिय वर्तुळातून तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत. या संदर्भात आमदार नवघरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क झाला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news