मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत वेगवेगळ्या ठिकाणी तरुण, तरुणीने संपवले जीवन | पुढारी

मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत वेगवेगळ्या ठिकाणी तरुण, तरुणीने संपवले जीवन

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील नहाद येथे एका तरुणाने तर हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील एका तरुणीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जीवन संपवल्याची घटना बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मयत आरती शिंदे यांच्यावर उत्तरीय तपासणी करून दिली जाणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.

जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावांमधून साखळी उपोषण सुरु झाले असून राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस आंदोलन अधिकच तिव्र होत आहे. मराठा आरक्षणाच्या चळवळीत सक्रीय असलेले नहाद येथील तरुण गोविंद कावळे (दि. २१) यांनी विहीरीत उडी मारून जीवन संपवले. गोविंद हे मंगळवारपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी तसेच गावकर्‍यांनी त्यांचा शोध सुरु केला होता. आज (दि. १ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावालगत विहीरीत सापडला.

या घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक जाधव, जमादार भुजंग कोकरे, भारशंकर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह विहीरी बाहेर काढला आहे. त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली असून मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे, तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही म्हणून मी जीवन संपवत असल्याचे चिठ्ठीत नमुद केले आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एक जीवन संपवल्याची हिंगोलीतील घटना

दरम्यान, जीवन संपवल्याच्या अन्य एका घटनेत हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील आरती नागोराव शिंदे (16) या तरुणीने बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता घरात जीवन संपवले. आरती ही मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होती. मंगळवारी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात देखील तिने सहभाग घेतला होता. बुधवारी सकाळी घरी कोणी नसतांना तिने जीवन संपवले. मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे तिच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत नमुद असल्याचे सुत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरीचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार दिलीप पोले, महिला पोलिस कर्मचारी गजभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

मयत आरती शिंदे या तरुणीच्या मृत्यूस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून दिली जाणार नाही तसेच अंत्यसंस्कारही केले जाणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. मराठा समाजातील तरुणांनी कळमनुरीच्या तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको सुरू केला आहे

Back to top button