

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : पंचायत समिती व नगरपालिका प्रशासनाने गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना घरकुल योजनेचा लाभ देत भ्रष्ट्राचार केला असा आरोप भीमशक्तीने केला आहे. त्यामुळे गरजूंची नावे घरकुल योजनेत समाविष्ट करणे आदी मागण्यांसाठी भीम शक्तीच्यावतीने सोमवारी (दि. १४) गाढव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. भीमशक्ती व काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
वसमत शहरासह ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे लाभ मिळत नाही. गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामुळे धनदांडग्यांना लाभ मिळाल्याचे दिसून येत आहे. त्वरित रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेत नव्याने नावे समाविष्ट करुन लाभार्थ्यांना घरकुल देणे, बोरी सावंत, भोगाव, करंजी, हट्टा, कळंबा, बळेगाव येथील गरजूंचे रमाई आवास योजनेत नव्याने नावे समाविष्ट करण्यात यावी, नगरपालिके अंतर्गत येणारे नसरतपुर, सीराज कॉलनी या भागातील गरजूंची नावे रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना यात समाविष्ट करणे, बोरी सावंत येथे दलित वस्तीचा निधी इतरत्र खर्च केला, याची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी १४ ऑगस्ट रोजी भीमशक्तीच्या वतीने गाढव मोर्चा काढण्यात आला.
१४ ऑगस्ट रोजी काढलेल्या मोर्चात दोन गाढव होते. गाढवांच्या पाठीवर नगरपालिका व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे पदनाम लिखित फलक लावून शहरातील विविध मार्गाने मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयवर धडकला. या मोर्चास काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना देण्यात आले. निवेदनावर काँग्रेसच्या प्रिती जयस्वाल, राजाराम खराटे, पुष्पक देशमुख, भीमशक्तीचे प्रमोद कुलदिपके, काशिनाथ गायकवाड, सागर दिपके, भीमा कांबळे, राहुल घोडके, गौतम खंदारे यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.