

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शिवारात एका विहीरीत पडलेल्या कोल्ह्यास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे. विहीरीतून बाहेर येताच कोल्ह्याने परिसरातील शेतात धुम ठोकली.
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर हिवरा जाटू शिवारात ॲड. मनिष साकळे यांचे शेत आहे. शेतात सिंचनासाठी विहीर घेण्यात आली असून या विहीरीला मुबलक पाणी देखील आहे. रविवारी (दि. ४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ॲड. साकळे हे शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विहीरीमध्ये पाहिले असता त्यात एक कोल्हा विहीरीच्या कपारीमध्ये बसल्याचे दिसून आले. या प्रकाराची माहिती तातडीने वन विभागाला दिली. दरम्यान, वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार, कर्मचारी संदीप वाघ यांनी तातडीने वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला घटनास्थळी रवाना केले.
या पथकातील कर्मचारी संतोष चिकाळकर, केशव नाईक, नामदेव जाधव, संग्राम भालेराव, सिद्दीकी, रणवीर यांच्या पथकाने दोरीच्या सहाय्याने एक बाज विहीरीत सोडली, मात्र कोल्हा बाजेवर आलाच नाही. त्यामुळे एका कर्मचाऱ्याने विहीरीत उतरून कोल्हयावर जाळे फेकले.या जाळ्यात अडकलेल्या कोल्ह्याला विहिरी बाहेर काढून त्यास मोकळे करताच त्याने परिसरातील शेतात धुम ठोकली. वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी मिनाक्षी पवार, कर्मचारी संदीप वाघ यांच्या सतर्कतेने कोल्हाला जिवदान मिळाले आहे.