

रत्नापूर : कळंब तालुक्यातील दहिफळ गावात दारूबंदीची मागणी जोर धरत आहे. गावातील महिलांनी काही दिवसांपूर्वी दारू विक्रीमुळे कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करीत राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मोर्चा काढला होता.
या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २३) निवेदनावरील सह्या व अंगठ्यांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. निवेदनावर सह्या केलेल्या चारशेपैकी ३७० महिलांनी अधिकाऱ्यांसमोर हजर राहून मागणीवर ठाम राहत अधिकाऱ्यांसमोर सह्या केल्या.
तालुक्यातील दहिफळ येथे गावांतर्गत दारूबंदी करावी
सह्या पडताळणी मोहिमेत ३७० महिलांनी स्वतः उपस्थित राहून सह्या केल्याचे स्पष्ट झाले असून, या मोहिमेचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. निवेदनातील सह्या व अंगठे वैध ठरल्यास पुढील प्रशासकीय कारवाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिव येथील निरीक्षक राहुल बांगर, तुळजापूर विभागाचे दत्तात्रय दिंडकर, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब राख, योगीनाथ कस्तुरे, उत्तमराव रामगुडे, सुनील कांबळे, पुष्पावती वायखुळे, नंदकुमार शिंदे, वसुंधरा खरात, नागेश नडमशेटवार, अनिकेत मानेदेशमुख, अनिल कोळी जनार्दन अंभुरे, अमर कोरे, महेश कंकाळ व कर्मचारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांचा महिलांशी प्रत्यक्ष संवाद
ग्रामपंचायतीकडून नाहरकत देऊ नये, या मागण्यांसाठी महिलांनी एकत्र येत लढा उभारत निवेदन सादर केले होते. निवेदनाची सत्यता तपासण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोमवारी दहिफळ येथे दाखल झाले. गावातील मुख्य चौकात महिलांना आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. संबंधित महिलांच्या सह्या व अंगठ्यांची पडताळणी करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या मागण्यांची नोंद घेतली.