

Woman dies after being crushed under sugarcane trolley
परंडा, पुढारी वृत्तसेवा : उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली चिरडून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर शहरात संतप्त भावना व्यक्त होत असून, ऊस वाहतुकीच्या वाहनांना शिस्त लावण्याची मागणी होत आहे.
गुरुवारी (दि.२०) सकाळी हा अपघात झाला. सविता शंकर मुसळे (५३, रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) या सोनारी येथे भैरवनाथाचे दर्शन करून परत परंड्यात येत असताना पवार कॉम्प्लेक्ससमोर उसाचा ट्रॅक्टर अचानक त्यांच्या दिशेने येताच त्या ट्रॉलीच्या चाकाखाली आल्या.
यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, परंडा बार्शी रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने सध्या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड गर्दी आणि अव्यवस्था निर्माण झाली आहे.
चुकीच्या दिशेने होणारी वाहतूक, खोल खड्डे, तसेच बेकायदेशीर वाहनचालकांमुळे अपघातांची संख्या वाढत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. या अपघातानंतर ठेकेदार व संबंधित बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.