

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : काहीही झाले तरी विधानसभा निवडणूक तुळजापूर मतदारसंघातून लढविणारच आहे. त्यासाठी मी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. पक्षाने नाही विचार केला तर मात्र प्रसंगी अन्य पर्यायांचाही विचार करु, असे सांगत रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. व्यंकटराव गुंड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी गुरुवारी (दि. २६) पत्रकार परिषद घेतली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, बाबुराव पुजारी उपस्थित होते.
अॅड. व्यंकटराव गुंड म्हणाले, की माझे कुटुंब ४० वर्षांपासून संघ परिवाराशी संबंधित आहे. आम्ही सातत्याने संघ विचाराशी बांधील राहिलो आहोत. त्यातच रुपामाता उद्योग समूहाच्या माध्यमातून धाराशिव, तुळजापूर तालुक्यात हजारो हातांना थेट रोजगार दिला आहे. रुपामाता मिल्क, रुपामाता अॅग्रोटेक, रुपामाता मनोरमा, रुपामाता पॉवर, रुपामाता मल्टीस्टेट, रुपामाता अर्बन आदींसह विविध उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला चालना दिली आहे.
बीडसह धाराशिव तसेच तुळजा पूर तालुक्यात तीन गूळ पावडर कारखाने सुरु केल्याने उस उत्पादकांना न्याय देण्याचे काम केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळीच मी इच्छुक होतो. त्या वेळी आ. राणाजगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आल्याने त्यांना तुळजापुरातून उमेदवारी देण्यात आली. तुमचा विचार पुढच्या वेळी करु. या वेळी थांबा, असे पक्षाने मला सांगितले. त्यानुसार मी आ. पाटील यांचे काम केले. त्यांना बहुमत दिले.
लोकसभेलाही मी उमेदवारी मागितली. तेव्हा हा मतदारसंघ भाजपला सुटणार नसल्याने मी शांत राहिलो. या वेळी मात्र मी मतदार जनसंवाद दौरा सुरु केला आहे. जवळपास १५० गावांना भेटी दिल्या आहेत. मतदारांना बदल हवा आहे. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. धाराशिव, तुळजापूर या तालुक्यांचा गतीने विकास झाला नसल्याने मी उमेदवारी मागितली आहे. काहीही झाले तरी आगामी निवडणूक लढविणार आहे. पक्षाने नाही उमेदवारी दिली तर अन्य पर्यायांचाही विचार करणार असल्याचे अॅड. गुंड यांनी सांगितले.
अॅड. गुंड यावेळी म्हणाले, की प्रस्थापित नेत्यांनी जिल्ह्याची सहकार व उद्योग चळवळ मोडीत काढली. प्रत्येक त्यांनी स्वार्थ पाहिला. या सर्वांची नावे योग्य वेळ आल्यावर मी जाहीरपण सांगेन. अर्थात ती नावे जनतेलाही माहिती आहेत.