Dharashiv News : फळभाज्या महागल्या, पालेभाज्या स्थिर, दर आणखी गडगडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Vegetables have become expensive at Dharashiv
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव येथील आठवडी बाजारात या आठवड्यात पालेभाज्यांचे दर स्थिर राहिले असले तरी फळभाज्यांचे दर मात्र वाढले आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात ग्राहकांपेक्षा विक्रेत्यांचीच गर्दी अधिक दिसून आली. सायंकाळनंतर पालेभाज्यांचे दर आणखी गडगडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
पालेभाज्यांचे दर स्थिरः मेथी आणि पालक १० रुपये प्रति पेंडी, तर कोथिंबीर १० ते १५ रुपये प्रति पेंडी दराने विकली जात होती. फळभाज्यांचे दर वाढलेः टोमॅटोचे दर वाढून ४० रुपये प्रति किलो झाले आहेत. कांदे २५ ते ३५ रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. लसूण ८० रुपये प्रति किलो तर आले ४० ते ६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.
शेवगा ११० ते १६० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. वांग्यांचा दर २० रुपये पाव किलोवरून ४० रुपयांवर पोहोचला आहे. दोडक्याचा दर १२० रुपये प्रति किलो तर बटाटे ३० रुपये प्रति किलो दराने मिळत आहेत. लिंबू ४० रुपये प्रति किलो तर दुधी भोपळा २० रुपये प्रति नग दराने विकला जात आहे. हिरवी मिरची ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.
ग्राहकांना कडधान्यांचा आधार
फळभाज्यांचे दर वाढल्याने ग्राहकांना सध्या वरण-भात आणि इतर कडधान्यांपासून बनवलेल्या पदार्थांवर अवलंबून राहावे लागत आहे.
शेतकऱ्यांना फटका
आषाढी एकादशीमुळे बाजारात खरेदीदारांची संख्या कमी होती. सायंकाळी पाच वाजेनंतर पालेभाज्यांचे दर आणखी खाली घसरले, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.

