Umarga Panchayat Samiti | उमरगा पंचायत समिती सभापती पदी शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले; भाजपला मोठा धक्का

पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सभापती व उपसभापतीपदी त्यातही एकाच गावातील दोन्ही महिलांची निवड झाली
Umarga Panchayat Committee
Umarga Panchayat Committee
Published on
Updated on

उमरगा : पंचायत समितीच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सभापतीपदी केसर जवळगा गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतीपदी मुळज गणातील अपक्ष रेखा विक्रम इंगळे यांनी तीन मतांनी विजय मिळवला. या निवडीत शिवसेना राष्ट्रवादीसह अपक्ष यांनी एकत्र येत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.

शहरातील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि. ७) सभापती व उपसभापती निवडीसाठी पिठासीन अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीला  एकूण १८ सदस्यांपैकी १७ सदस्य उपस्थित होते. जकेकूर गणातील उबाठा गटाचे हरि जाधव अनुपस्थित होते. यावेळी तहसीलदार गोविंद येरमे आणि गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. सुरवातीला पिठासीन अधिकारी दत्तू शेवाळे यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर निवड प्रक्रिया सुरू झाली. सभापती पदासाठी शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी भाजपचे तलमोड गणातील सदस्य दगडू कालीदास मोरे व मुळज गणातील अपक्ष रेखा विक्रम इंगळे यांनी अर्ज दाखल केले.

छाननीनंतर दोन्ही वैध अर्ज ठरले. यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये दगडू मोरे यांच्या बाजूने भाजपाचे ७ सदस्य उभे राहिले, तर रेखा इंगळे यांच्या बाजूने शिवसेना ५, काँग्रेस ३, राष्ट्रवादी १ व अपक्ष १ असे एकूण १० सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर तीन मतांच्या फरकाने रेखा इंगळे यांना विजयी घोषित केले. निकाल जाहीर होताच सभागृहाबाहेर उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. निवडीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी सभापती जितेंद्र शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी सभापती अभय चालुक्य, नगराध्यक्ष किरण गायकवाड, काँग्रेसचे नानाराव भोसले आदीसह पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रथमच सभापती उपसभापती पदावर एकाच गावच्या दोन्ही महीला

पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून प्रथमच सभापती व उपसभापतीपदी त्यातही एकाच गावातील दोन्ही महिलांची निवड झाली. यात विशेष म्हणजे आकांक्षा चौगुले या पंचायत समितीच्या सर्वात तरुण उच्चशिक्षित सभापती म्हणून निवडल्या गेल्या आहेत. यावेळी नूतन सभापती चौगुले यांनी विकासाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे युवक व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचायत समिती कामकाजात नवे विचार आणि ऊर्जा येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुलीच्या निवडीनंतर वडील भावूक

नूतन सभापती आकांक्षा चौगुले यांनी सभापती पदाची खुर्ची स्वीकारण्यापूर्वी वडील तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. यावेळी माजी आमदार चौगुलेही चांगलेच भावूक झाल्याचे दिसून आले. हा भावूक क्षण उपस्थितांच्या लक्षात राहिला.

केवळ औपचारिकता, निवड आधीच पक्की

पंचायत समिती आवारात ‘सभापती पंचायत समिती उमरगा’ अशी भगव्या रंगाची पाटी लावलेल्या नव्या चारचाकी वाहनातून नूतन सभापती चौगुले स्वतः वाहन चालवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी वाहनांत समोरच्या बाजूला माजी आमदार ज्ञानराज चौगुले व नगराध्यक्ष किरण गायकवाड उपस्थित होते. त्यामुळे चौगुले यांची आधीच सभापतीपदावर निवड निश्चित होती केवळ औपचारिकता बाकी असल्याची चर्चा सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news