Umarga farmer protest |उमरगा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा: काँग्रेसचा टॅक्टर - बैलगाडीसह तहसील कार्यालयावर मोर्चा!

रस्त्‍यावर बैलगाड्या सोडल्यामुळे वाहतूकीवर परिणाम : हेक्टरी ५० हजाराची मदत करण्याची मागणी
आंदोलनकर्त्यांनी बैल सोडून गाड्या आडव्या उभ्या केल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला
आंदोलनकर्त्यांनी बैल सोडून गाड्या आडव्या उभ्या केल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला
Published on
Updated on

उमरगा : तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि ११) तहसील कार्यालयावर बैलगाड्या व ट्रॅक्टरसह विराट मोर्चा काढण्यात आला.

शहरातील हुतात्मा स्मारका पासून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि करपलेले सोयाबीन हातात घेऊन सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

‘कोरडा दुष्काळ जाहीर करा’, ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या’ तसेच शासन विरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नानाराव भोसले, विजय दळगडे, अँड दिलीप सगर, नगरसेवक विशाल कानेकर आदी उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयात पोहंचताच त्याचे सभेत रूपांतर झाले.

मोर्चाला उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, अर्जून बिराजदार, दिलीप सगर, रेखा सुर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार डॉ अमित भारती यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात नगरसेवक अभिजीत मोरे, बाबा मस्सके, सतीश जाधव, अमित रेड्डी, अभिषेक औरादे, दादासाहेब गायकवाड आदिसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान मोर्चातील शेतकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर गाडीचे बैल सोडून गाड्या आडव्या उभ्या केल्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मोर्चात पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरिप पिके करपून शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत, पीकविमा व अनुदानाच्या प्रलंबित रकमा द्याव्यात. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात; अन्यथा तहसील कार्यालयाच्या आवारात जनावरे बांधण्याचा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी दिला.

केंद्र व राज्य सरकारकडून गेल्या बारा वर्षांपासून शेती व शेतकऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. शेतकरी संकटात असताना आमदार, खासदार आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे, असा घणाघाती आरोप जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी केला. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर रूमणे हातात घेऊन तीव्र आंदोलनांचा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news