

Ujani Dam Dharashiv 1 TMC Water
धाराशिव : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील मागणी मान्य केल्यानंतर आता जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पुढील आवर्तनात हे पाणी देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. घाटणे बॅरेजमधून रामदरा, पांगरदरवाडी आणि सिंदफळ येथील तलावांमध्ये हे पाणी सोडण्यात येणार आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उजनी धरणातून एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. घाटणे बॅरेजमधून रामदरा, पांगरदरवाडी आणि सिंदफळ येथील तलावांमध्ये पाणी सोडण्याबाबतचा रीतसर प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत आवश्यक कार्यवाहीस मान्यता दिली.
त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव कृष्णा मराठवाडा पाटबंधारे मंडळाकडे पाठविण्यात आला. मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो अंतिम मान्यतेसाठी जलसंपदामंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता. आमदार पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पुढील आवर्तनात एक टीएमसी पाणी देण्यास त्यांनी मंजुरी दिली.
आता घाटणे ते रामदरा या मार्गावरील योजनेची चाचणी घेऊन एक टीएमसी पाणी धाराशिव जिल्ह्यात पिण्यासाठी साठविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.