Tuljabhavani Devi : तुळजाभवानी मातेची शेषशाही महापूजा

घटस्थापनेपासून दररोज आहे गर्दी; सातव्या माळेलाही भाविकांची जमली मांदियाळी
 Tuljabhavani Devi
तुळजाभवानी मातेची शेषशाही महापूजा
Published on: 
Updated on: 

संजय कुलकर्णी

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेची शनिवारी (१७ ऑक्टोबर) सातव्या माळेला शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात आली.

शारदीय नवरात्रोत्सवात मातेचे मुख, धर्म दर्शन, सःशुल्क दर्शन त्याचबरोबर अभिषेक पूजा दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. सर्व पूजाविधीचे प्रकार यंदाच्या नवरात्रोत्सवात प्रथा, परंपरेनुसार सुरू आहेत. महाद्वारात श्रीफळ वाढवून कुलधर्म, कुलाचाराचा श्रीगणेशा करताना दिसत आहेत. मातेने नऊ दिवसांच्या घनघोर युद्धात शुंभ, नीशुंभ दैत्यांचा वध केला म्हणून शारदीय नवरात्र महोत्सवातील शनिवारी सातव्या माळेला श्री तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा बांधण्यात आली.

श्रीफळ, केळीचे भाव गगनाला

सध्या आई तुळजाभवानी मातेचा उत्सव सुरू असल्याने मातेच्या ओटीसाठी श्रीफळ, केळी या दोन वस्तू आवश्यक मानल्या जातात. नेमका याचा फटका भाविकांना बसत आहे. या दोन्ही पूजा वाढीव दराने विक्री होत असल्याने मातेच्या भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मातेची ओटी भरण्यासाठी श्रीफळ, केळी या वस्तू आवश्यक असल्याने भाविकांना चढ्या दराने त्या खरेदी कराव्या लागत आहेत. शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वी श्रीफळ ३० रुपयाला मिळत होता, मात्र सध्या एका श्रीफळाची किंमत ५० रुपये झाली आहे. केळीचे दरही ३० रुपये डझनवरून ५० ते ६० रुपये झाले आहेत. या वस्तू महाग असल्या तरी खरेदी करण्याशिवाय भाविकांकडे पर्याय नाही.

सर्रास सुरू आहे लूट !

तुळजापूर शहराच्या चारही बाजूला ४ ते ५ किमी अंतरावर चेक पोस्ट केले असून भाविकांच्या वाहनांची तपासणी होत आहे. तेथेच वाहनतळ केल्याने भाविकांची वाहने शहरात येऊ दिली जात नाहीत. याचा फायदा मात्र ऑटो रिक्षावाल्यांनी उचलला आहे. वाहनतळ ते मंदिरानजीक येण्यासाठी भक्तांकडून १०० ते १५० रुपये उकळले जात आहेत. पोलिस आणि आरटीओ खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्याने सर्रास लूटमार चालू आहे. चहा, नाष्टाही महागला असून चहा २० ते ३० रुपये तर पुरी-भाजी,भजी, इडली-वडा सांबर,वडा-पाव या खाद्यपदार्थांचे भाव यात्राकाळात ८० ते १०० रुपये झाले आहेत. त्यामुळे अनेकजण उपाशीपोटीच परतीचा रस्ता धरत आहेत. अन्न व भेसळ प्रशासन वस्तूंच्या गुणवत्ता, दर्जा तपासत असले तरी दर वाढ रोखण्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. देवीच्या नैवेद्यासाठी भक्तांकडून खरेदी केला जाणाऱ्या विविध प्रकारच्या पेढ्यांचा दर्जा आणि भाववाढीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news