

डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात चारचाकी वाहनांसाठी स्वच्छता कराच्या नावाखाली 70 रुपये आकारले जात असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही आकारणी अन्यायकारक असून ती कमी करण्याची मागणी वाहनधारक व भाविकांकडून होत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. शहरात प्रवेश करताच प्रत्येक चारचाकी वाहनावर नगरपरिषदेच्या वतीने 70 रुपयांची पावती आकारली जाते. ही रक्कम केवळ 10 ते 20 रुपये असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी वसंतदादा पाटील यांनी मंदिर प्रवेशावरील कर रद्द केला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत पार्किंग व स्वच्छता कराच्या नावाखाली मोठी रक्कम आकारली जात असल्याची टीका होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पार्किंगसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असतानाही, नगरपरिषदेकडून संबंधित ठिकाणांचे ठेकेदारी पद्धतीने लिलाव केल्याने खासगी गुत्तेदारांकडून मनमानी पद्धतीने वसुली होत असल्याचा आरोप आहे.
हा प्रकार तत्काळ बंद करावा, अशी मागणी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्याकडे करण्यात आली आहे.दरम्यान, पुजारी कुटुंबांकडून भाविकांची चांगली सोय केली जात असली तरी शहरात प्रवेश केल्यानंतर आकारण्यात येणारा हा कर जाचक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः ट्रॅव्हल्स व भाडेतत्त्वावरील वाहनधारकांना हा कर परवडणारा नसून, तो 20 रुपयांपर्यंत कमी करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
याशिवाय, कर आकारणीच्या तुलनेत शहरात आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचीही तक्रार आहे. स्वच्छतेचा अभाव, सुलभ शौचालयांची कमतरता तसेच वाहनचालकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तुळजापूर मंदिराचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत असतानाही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी वाढत असून, संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.