

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्तिदेवता तुळजाभवानीमातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेला मंगलमय वातावरणात आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला.
रविवारी पहाटे तुळजाभवानीमातेची मंचकी निद्रा संपुष्टात येऊन मुख्य मूर्तीची पारंपरिक पद्धतीने सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते घटस्थापनेचा धार्मिक विधी पार पडला. तत्पूर्वी, मंदिर परिसरात संबळाच्या कडकडाटात आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात घटकलशाची मिरवणूक पार पडली.
घटस्थापनेच्या पहिल्या माळेला देवीच्या पूजेचा मान भोपे पुजारी विनोद सुनील सोंजी (कदम) यांचा होता. मंदिरातील घटस्थापना करण्याची जागा ही सिंह गाभाऱ्यात देवीच्या डाव्या बाजूला असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या जमिनीतील माती घटस्थापनेकरिता आणण्यात येते. त्या मातीला ‘वावरी’ असेही म्हणतात. प्रथेप्रमाणे धाकटे तुळजापुरातील कुंभार कुटुंबीयांकडून कलश आणण्यात आला.
जिल्हाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गोमुख तीर्थाजवळ गंगा आवाहन करण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत हा घट कलश सिंहाच्या गाभाऱ्यात आणून तो प्रतिष्ठापित करण्यात आला. तुळजापुरातील शेटे कुटुंबीयांकडून सप्तधान्य (जवस, करडई, मूग, ज्वारी, गहू, मका व सातू) दिले जाते. घटाची स्थापना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाली.