

संजय कुलकर्णी
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सहाव्या माळेला शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी चार वाजेपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत मूर्तीला पंचामृत अभिषेक पार पडून शोड्षोपचार पूजा, नैवेद्य, धुपारती, अंगारा आदी धार्मिक विधी आटोपल्यानंतर मातेची मुरली अलंकार ही विशेष अवतार महापूजा बांधण्यात आली.
श्री तुळजाभवानी मातेने शारदीय नवरात्र महोत्सवातील नऊ दिवसात दैत्यांशी घनघोर युद्ध करून त्यांचा वध केल्यानंतर सर्व देवी, देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाले. त्याप्रसंगी आनंदित होऊन भगवान श्रीकृष्णांनी स्वतःकडील मुरली मातेस अर्पण केली. मातेने या मुरलीची मंजुळ धून ऐकवून सारे ब्रह्मांड जागे केले. ही धून ऐकून सर्व देवताही आनंदोत्सव साजरा करु लागले. शिवाय काही भयभीत देवी-देवता स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले, अशी आख्यायिका आहे. त्या प्रसंगाची आठवण म्हणून श्री तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार विशेष अवतार महापूजा बांधण्यात येते.
गुरुवारी पाचव्या माळेला देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांचा ओघ मंदावला होता, मात्र शुक्रवारी सहाव्या माळेला भक्तांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. असंख्य भक्त मध्यरात्री १ वाजल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंतची वेळ दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत. सध्या ‘ऑक्टोबर हीट’ चा कहर जाणवत असल्याने सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत देवी दर्शनार्थ भक्तांची गर्दी कमी प्रमाणात जाणवत आहे. सध्या भक्तांना घाटशीळ पार्किंगकडून बीडकर पायरीमार्गे दर्शन मंडपात भाविक सोडण्याचे नियोजन असताना भाविक मातेच्या महाद्वारात मोठी गर्दी करताना दिसत आहेत.