

Tuljapur Shiv Sena Shinde faction has big incoming
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या अपसगा ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान सरपंचाने आपल्या सहकार्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. या घटनेमुळे तुळजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. भाजपासाठी येथील प्रवेश आत्मचिंतन करणारे आहेत.
पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, सचिव संजय मोरे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले व तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला.
या वेळी अपसिंगा गावचे भाजप सरपंच अजित क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य सुजित सोनवणे, सचिन रोंगे, पांडुरंग दिलपाक, आबा गुरव, सुरेश सुरडकर यांच्यासह वडगाव (देव) चे कपिल देवकते, वाणेगावचे सरपंच संभाजी कोरे पाटील, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोहन ढेकले, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यापूर्वीही शिवसेनेने तालुक्यातील अनेक भाजप सरपंचांचा प्रवेश घडवून आणला होता. आता पुन्हा एका मोठ्या लाटेत कार्यकर्ते व स्थानिक नेते भाजप सोडून शिवसेनेकडे वळत असल्याने तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी तालुका प्रमुख अमोल जाधव यांच्याकडून आगामी काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद पंचायत समिती माजी सदस्य देखील पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याचे या निमित्ताने सांगितले आहे. पक्षाला मिळणारा प्रतिसाद अत्यंत लक्षणीय असून ग्रामीण जनतेच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करण्यासाठी शिवसेना शिंदे गट वचनबद्ध आहे असे सांगितले आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेते, तुळजापूर शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे, युवा नेते शहाजी हाक्के, भुजंग मुकेरकर, रितेश जावळेकर, नितीन मस्के, स्वप्निल सुरवसे यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.