Tuljapur News | मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरली : तुळजापूर यात्रा मैदान प्रश्नावर महिलांचे आक्रमक आंदोलन

तीन दिवस आंदोलन स्थगित, सोमवारी पुन्हा एल्गार; महिलांचा प्रशासनाला इशारा
Tuljapur News | मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरली : तुळजापूर यात्रा मैदान प्रश्नावर महिलांचे आक्रमक आंदोलन
Tuljapur News | मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरली : तुळजापूर यात्रा मैदान प्रश्नावर महिलांचे आक्रमक आंदोलन
Published on
Updated on

तुळजापूर : तुळजापूर येथील यात्रा मैदानावर कार पार्किंगच्या मागणीसाठी गुरुवारी नगरपरिषद कार्यालयासमोर महिलांच्या वतीने करण्यात आलेले ठिय्या आंदोलन अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्या महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

यात्रा मैदानाबाबत यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत महिलांनी नगरपरिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर किंवा ठोस आश्वासन मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, दिलेल्या वेळेत नगरपरिषदेच्या वतीने कोणतेही स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

यावेळी महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी, चोळी आणि बांगड्या अर्पण करून प्रतीकात्मक ओटी भरली आणि मुख्याधिकाऱ्यांचा जाहीर निषेध नोंदविला. प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात हा निषेध करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यानंतर नगरपरिषदेच्या वतीने आंदोलनकर्त्यांना एक पत्र देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून ठोस निर्णय अथवा लेखी आश्वासन नसल्याचे सांगत महिलांनी ते पत्र स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी सध्या हे आंदोलन पुढील तीन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यात्रा मैदानाच्या प्रश्नावर समाधानकारक निर्णय न झाल्यास येत्या सोमवारी पुन्हा अधिक तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनाच्या नेतृत्वाकडून देण्यात आला.

तुळजापूरमधील यात्रा मैदानाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच तापत असून आता या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत नगरपरिषद प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news